वैजापूर – शिऊर आगारात एस.टी. महामंडळाच्या “लालपरी” चा अमृतमहोत्सव साजरा

वैजापूर ,२ जून  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लोकवाहिनी बसने म्हणजेच “लालपरीने” अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केला. यानिमित्ताने  वैजापूर, शिवूर व देवगाव येथील एस.टी.आगारात विविध उपक्रम व कार्यक्रमाने लालपरीचा अमृतमहोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

आगार प्रमुख एन.बी.नेरकर व सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम साजरा झाला. वैजापूर बस स्थानकाची साफ -सफाई करण्यात येऊन  सुंदर रांगोळी काढण्यात आली. बसेसची स्वच्छता करण्यात आली.बसेचचे पूजन करण्यात येऊन चालक डी.व्ही.विघे, आर.बी.शेख, वाहक ए.पी.पवार व एस. एम.फकीर यांनी एस.टी.ला पुष्पहार घालून पूजन केले तर नेरकर व एस.टी.धानुरे व धोंडीराम राजपूत यांनी प्रवाशांना फुले वाटून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत आनंददायी या सोहळ्याला एस. टी. या प्रदीर्घ सेवेचे वाहक- चालक व एस.टी. अधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करण्यात आले.नेरकर यांच्या या अनोख्या कार्यक्रमाने प्रवासी भारावून गेले.