वैजापूर येथे महसूल विभागाची विविध विषयांवर बैठक

लोकांची कामे तातडीने मार्गी लावा – अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे

वैजापूर ,२३ जून/ प्रतिनिधी :-  महसूल प्रशासन शासनाचा कणा आहे. नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच  अधिकाऱ्यानी लोकांचे कामे तातडीने मार्गी लावावे असे कडक शब्दात अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याना ठणकावले. वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी (ता.२२) महसूल विभागाची विविध विषयावर बैठक पार पडली.

यावेळी गव्हाणे यांनी नवीन रेती धोरणाच्या अनुषंगाने शासकीय दरानुसार वाळू उपलब्ध करून देणे, नवीन रेतीघाट प्रस्ताव सादर करणे, बळीराजा सर्वेक्षण, गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी उपलब्ध करून देणे, सलोखा योजनेची जनजागृती व्यापक स्वरूपात करणे व अशा प्रकरणांचा शोध घेऊन प्रकरणे निकाली काढणे तसेच कमी जास्त पत्रकानुसार क्षेत्र दुरुस्ती करणे अशा अनेक विषयावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना गव्हाणे यांनी सूचना केल्या. या बैठकीला उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, किरण कुलकर्णी, गटविकास अधिकारी हनुमंत बोयनर, सहाय्यक गटविकास अधिकारी, अमेय पवार, उपाधीक्षक भूमी अभिलेख मोरे,अवल कारकून पारस पेटारे, दिपक त्रिभुवन, दिलीप त्रिभुवन, परमेश्वर कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.