भुजबळांच्या ‘त्या’ मागणीमुळे अजित पवारांची अडचण

मुंबई ,२२ जून /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकतीच त्यांना विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करावं आणि संघटनेत एखादी जबाबदारी द्यावी. असं बोलून दाखवलं होतं. यामुळे अजित पवार यांचं आता पक्षात काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. अजित पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यावर संघटनात्मक निर्णय होईल. असं म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याविषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी किंवा एखाद्या लहान समाजाकडे द्यावं, असं भुजबळ म्हणाले आहेत. भुजबळ यांनी केलेल्या या मागणीमुळे अजित पवार यांची मात्र गोची झाली आहे. कारण अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे केलेली मागणी ही प्रदेशाध्यक्ष पदाचीच होती.

याविषयी बोलताना भूजबळ म्हणाले की, भाजपचेही प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसींकडे आहे. या पदावर ओबीसी किंवा एखाद्या लहान समाजाला या पदावर काम संधी द्यावी. मला यापूर्वी प्रदेशाध्यक्ष पद मिळाले होते मात्र ते फक्त चार महिन्यांकरता होते. आता पक्षात ओबीसी तसंच इतर समाजाचे नेते चांगलं काम करत असून त्यांना संधी दिली पाहिजे, असही भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्षाकडे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते आहेत. असं म्हणताना मलाही ते पद दिले तरी मी ती जबाबदारी पार पाडेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, आमच्या पक्षात लोकशाही आहे. मी पक्षाच्या विविध मंचावर भूमिका मांडत असतो. कधी कधी व्यक्तीगत भूमिकाही मांडतो. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या मागणीविषयी बोलताना अजित पवार यांना विचारा त्यांनी पक्षात मला काहीही पद द्या असं म्हटलं आहे. शरद पवार त्यांचं बोलण ऐकत होते. ते काय तो निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात माझ त्यांच्याशी बोलण झाले नाही. असंही ते म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

25 वर्षांच्या जडणघडणीमध्ये नवीन पिढी पुढे येत आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे. राष्ट्रीय मान्यता गेली आहे. बरेच जण मंत्री होतात पण स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही निवडून आणू शकत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आणू शकतात, केजरीवाल दोन राज्य आणू शकतात तर शरद पवार सर्वांत उजवे आहेत की नाही? मग आपण स्वतःच्या ताकदीने राज्यात सरकार का आणू शकलो नाही. मुंबई आणि विदर्भात कमजोर पडलो आहे. मुंबईत अध्यक्ष निवडता आला नाही. सेलमध्ये बदल करायचे की नाही? भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही, अशी स्पष्टी भूमिका यावेळी अजित पवार यांनी घेतली.

विरोधी पक्षनेतेपदात रस नाही : अजित पवार

नव्या चेहराला विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संधी द्यायची आहे. विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही. मला विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनांची जबाबदारी द्या, अशी जाहीर मागणीच अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांची प्रदेश अध्यक्ष होण्याची इच्छा असून विरोधी पक्षनेते पद सोडण्याच्या तयारीत दिसले. संघटनामध्ये मोठी जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.