मान्सून २४ जूनला मुंबईत बरसणार ; विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणातही सक्रिय होणार

मुंबई ,२२ जून /प्रतिनिधी :-बिपरजॉय चक्रीवादळामुळे मंदावलेल्या मान्सूनची शेतकऱ्यांसह सर्वच जण सध्या आतुरतेने वाट पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी पट्ट्यामध्ये सक्रिय होईल, अशी गोड बातमी हवामान खात्याने दिली आहे. मराठवाड्यातही यामुळे ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर पुढच्या दोन दिवसात म्हणजे २४ आणि २५ जूनला पावसाचा जोर वाढेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, मान्सून सध्या मुंबईच्या उंबरठ्यावर असून २४ जून रोजी तो मुंबईत दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून सर्वत्र सक्रिय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.