राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस – भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मुंबई ,६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेत शास्त्रज्ञांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणात ऑरेंज अलर्ट

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर ७ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ८ ते १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात यलो अलर्ट

विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १० ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.