वैजापूर पोलीस मैदानाचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्याची मागणी

पोलिस ग्राऊंडच्या जागेवर खासगी मालकाचा दावा
वकिलामार्फत पाठवली कायदेशीर नोटीस

वैजापूर ,​४​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस ग्राऊंडची जागा असलेल्या भुमापन क्रमांक ४६७ मधील ०.७३ आर क्षेत्र जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा येथील लतिफ शहा चॉंद शहा (रा. दर्गा बेस) यांनी केला आहे. या जागेबाबत मालकी हक्क सांगत जागेवर पोलिस विभागामार्फत सुरु करण्यात आलेले बांधकाम थांबवण्यात यावे अशी कायदेशीर नोटीस शहा यांनी वकिलामार्फत पोलिस प्रशासनाला पाठवली आहे.

वैजापूर भुमापन क्षेत्रातील तत्कालिन क्रमांक एक मधील ०.७३ आर शेतजमीन शेख चॉंद शहा शेख जमाल शहा यांच्या मालकीची होती. शेख चॉंद शहा हे १९७२ मध्ये मयत झाले. तेव्हापासुन लतीफशहा, फारुक शहा व इतर हे त्या जागेचे कायदेशीर वारस आहेत. या जागेशी पोलिस व महाराष्ट्र शासन यांचा कुठलाही संबंध नसतांना ही जागा पडित असल्याने व पोलिस कार्यालय हे पडित जमिनीच्या दक्षिण बाजुला असल्याने या जागेवर वाहने उभी करण्यात येत होती. मात्र नंतरच्या काळात ही जागा पडित असल्याचा गैरफायदा घेत पोलिसांनी ही जागा सिटी सर्व्हेचे काम झाले त्यावेळी खोटेपणाने रेकॉर्डला लावली असा आरोप पक्षकाराने नोटिसीत केला आहे‌. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख,छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रकरण दाखल केले असुन उप अधिक्षक, भुमी अभिलेख, वैजापूर यांना याप्रकरणात चौकशी करुन संबंधित क्षेत्र कमी करण्याची विनंती केली आहे. याबाबत येथील ॲड. महेश कदम यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच मनाई हुकुम मिळवण्यासाठी येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे‌.