वैजापूर बस आगारात वनिता मोरे पहिल्या महिला चालक ; वैजापूर – गंगापूर पहिली बस फेरी केली यशस्वीरीत्या पूर्ण

वैजापूर ,२३ जून/ प्रतिनिधी :-  राज्य परिवहन महामंडळाच्या वैजापूर आगारात वनिता लक्ष्मण मोरे या महिला बस चालक बुधवारी रुजु झाल्या. त्या या आगारातील पहिल्या महिला चालक ठरल्या असून त्यांनी वैजापूर ते गंगापूर ही पहिली बस फेरी यशस्वीरित्या पुर्ण केली. 

एसटी महामंडळात महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून बुधवारी वैजापूर आगारातील महिला चालकाने प्रवासी वाहतूक करत वैजापूर ते गंगापूर ही सेवा बजावली.

छत्रपती संभाजीनगर विभागातील वैजापूर आगारात या ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. या महिला चालकांनी ३०० दिवसांचे उजळणी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर एसटी महामंडळाच्या समितीने त्यांची चाचणी घेतली. त्यात वनिता लक्ष्मण मोरे या महिला चालक उत्तीर्ण झाल्या. यानंतर ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. हे प्रशिक्षण ३ मे रोजी पूर्ण झाले. तर २२ मे रोजी अंतिम चाचणी घेतल्यानंतर १ जून रोजी त्यांना रूजू करून घेण्यात आलेले आहे.

एसटी महामंडळात कार्यालयीन पदांवर तसेच वाहक म्हणूनही महिला आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. यानंतर महामंडळाने चालक पदावरही महिलांना नियुक्त्या देण्यासाठी भरती केलेली आहे. विभागातील पाच महिलांची चालक पदासाठी निवड झालेली आहे. चालक वनिता मोरे या चालक आणि वाहक म्हणून वैजापूर आगारात रुजू झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांना वाहक म्हणून कार्यभार सोपवला मात्र  बुधवारी दि २१ जून रोजी त्यांच्या हाती वैजापूर गंगापूर फेरीसाठी बसचे स्टेअरिंग देण्यात आले. चालक म्हणून त्यांनी वैजापूर आगारात पहिला मान मिळवला आहे. वनिता मोरे -जगताप या विनायकनगर येथील राहिवासी असून त्यांचे माहेर हे तालुक्यातीलच भगूर हे आहे. त्यांचे शिक्षण हे करुणा निकेतन शाळेत तर महाविद्यालयिन शिक्षण विनायकराव पाटील महाविद्यालयात झाले आहे. तीन वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षातून त्यांनी एसटी महामंडळात स्वतःला सिद्ध केलंय. स्टेअरिंग हाती घेऊन वैजापूर बस स्थानकात आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.