वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात ; हाणामारी – भांडणात सरली सहा वर्षे

वैजापूर,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- हाणामारी, राडेबाजी व वस्त्रहरण अशा विविध घटनांनी कायमच चर्चेत असलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 10 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला आहे. गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात अपवाद वगळता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फोकस करण्याऐवजी संचालक मंडळाची राडेबाजीच चर्चेत राहिली. या खेचाखेचीच्या राजकारणात आतापर्यंत विविध राजकीय पक्षांचे चार सभापती बाजार समितीवर येऊन गेले. यात काही औट घटकेचे तर काहींना दीर्घकाळ सत्ता गाजविता आली.  

 दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता प्रशासकराज आले असून या पदावर सहायक निबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकमंडळाच्या 18 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली होती. वास्तविक पाहता सन 2021 मध्ये बाजार समितीच्या संचालकमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. परंतु कोरोनामुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकांना ब्रेक लागला. पर्यायाने बाजार समितीची निवडणूकही लांबणीवर पडली. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकमंडळास तब्बल वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली. निवडणुकीत एकूण 18 पैकी 10 जागांवर सेनेने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी चार जागा मिळविल्या. 

सेनेचे काकासाहेब पाटील सभापतीपदी विराजमान झाले.  सुरवातीचे पहिले दीड वर्ष सर्वच गुण्यागोविंदाने नांदले. परंतु त्यानंतर बाजार समितीमध्ये ख-या अर्थाने राडेबाजी सुरू झाली. तत्कालीन सेनेच्या पक्षनेतृत्वाने पाटील यांना राजीनामा देण्याचे फर्मान सोडल्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्वाविरुध्द बंड पुकारून आदेश धुडकावून लावला. त्यानंतर सेनेच्या संचालकांनी पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचे अस्त्र उपसून त्यांना पायउतार करण्याचा प्रयत्नही फसला. अविश्वास ठराव बारगळल्याने पाटील यांचे सिंहासन शाबूत राहून त्यांनी आणखी काही दिवस सत्ता भोगून नंतर पदाचा राजीनामा दिला. काकासाहेब पाटील यांनी पक्षादेश झुगारून दिल्याने काँग्रेसचे माजी खासदार स्व.  रामकृष्णबाबा पाटील व सेनेचे माजी आमदार स्व.  आर.एम. वाणी यांच्या ‘जवळीकतेत’ वितुष्ट आले.  याच धामधुमीत सभापती काकासाहेब पाटील व संचालक संजय निकम यांच्यात जोरदार हाणामारी होऊन पाटील यांच्या अंगावर शाई फेकून त्यांचे ‘वस्त्रहरण’

( कपडे फाडले ) करण्यात आले. एवढेच नव्हे तर बाजार समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमातही राडा होऊन पाटील यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला.

संजय निकम यांनाही सभापती होण्याची महत्वाकांक्षा होती. पक्षनेतृत्वाने त्यांना तसा शब्दही दिला होता. परंतु स्वकीयांसह अन्य पक्षातील संचालकांचा विरोध पाहता निकम यांना ऐनवेळी ‘विश्रांती’ घेण्याचे फर्मान सोडून सेनेचेच रामहरी जाधव यांना सभापतीपदावर विराजमान होण्याची संधी देण्यात आली. त्यांना सात महिने संधी मिळाली. सभापतीपदाच्या बोहल्यावर बसणार असल्यामुळे निकम यांनी सर्व संचालकांना वारीवर ( सहलीवर ) घेऊन गेले होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. नाही म्हणायला जाधव यांच्यानंतर निकम यांचा सभापतीपदासाठी नंबर लागला. परंतु ते औट घटकेचे सभापती ठरले. केवळ सहा महिन्यात त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले. त्यांनाही पायउतार करण्यात स्वकीयांनीच सिहांचा वाटा उचलला. अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वीच निकम यांनी राजीनामा दिल्याने अविश्वास ठरावाची हवा निघून गेली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भागीनाथ मगर यांनी सभापतीपदाची धुरा हाती घेऊन तब्बल सव्वादोन वर्षे म्हणजेच आतापर्यंत पदावर राहिले. ते सभापतीपदावर विराजमान होताच बाजार समितीमध्ये मगर व निकम या दोघांमध्ये शीतयुद्ध पेटून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडून एकमेकांविरुध्द राळ उठवायला सुरवात केली. दोघेही आजी – माजी सभापती एवढे इरेला पेटले की, एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्याची जणू अहमहमिका लागली की काय?  असे चित्र निर्माण झाले होते. एकमेकांना खिंडीत गाठण्याची संधी कुणीच सोडली नाही. 

शेवटचा दिस गोड व्हावा…

सरतेशेवटी शेवटचा दिस गोड व्हावा.  या उक्तीनुसार सर्वांनीच नमते घेऊन विकासासाठी एकत्र आले. परंतु तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. संचालकांना उशिरा सुचलेले हे शहाणपण होते. आतापर्यंत म्हणजेच सहा वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने चार सभापती पाहिले. प्रत्येकाच्या कार्यकाळात विकासकामे झाली नाही. असे म्हणता येणार नाही. परंतु एकोप्याने राहिले असते तर यापेक्षाही विकास साधता आला असता. एवढे मात्र नक्की. .!