वैजापूर तालुक्यात सरपंचपदासाठी 155 तर सदस्यपदासाठी 615 उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गावपुढारी व कार्यकर्त्यांची गर्दी 

वैजापूर, ३ डिसेंबर  / प्रतिनिधी :- ऑक्टोबर व डिसेंबर 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह सदस्य पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 2 डिसेंबरपर्यंत सरपंच पदासाठी 155 व सदस्य पदांसाठी 615 असे एकूण 770  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.  दरम्यान गुरुवार उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणाऱ्यांसह गावपुढारी व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. 

तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची मदत ऑक्टोबर व डिसेंबर 2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास  सुरवात झाली होती. 25 ग्रामपंचायतींच्या एकूण 77 प्रभागातील 215 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 2 डिसेंबरपर्यंत सरपंचपदांसाठी 155 व सदस्य पदांसाठी 615 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 5 डिसेंबर रोजी अर्जाची छानणी केली जाणार आहे. तसेच 7 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 7 डिसेंबर रोजीपर्यंत माघारीसाठी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातून कितीजण माघार घेतात. याबाबत गावपातळीवरील नागरिकांना उत्सुकता लागून आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली.

28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना संकेत स्थळाच्या तांत्रिक अडथळयामुळे अनेक इच्छुकांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास अडचणीना समोर जावे लागले होते. शुक्रवारी तहसील कचेरीत पारंपरिक पध्दतीने उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. निवडणूक विभागाने ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान मुदत संपलेल्या खालील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे.

1)महालगाव, पानवी बुद्रुक / वक्ती 2)अव्वलगाव / हमरापूर 3) बाबतरा 4) बेलगाव 5) भग्गाव 6) डागपिंपळगाव 7) गोळवाडी / मिरकनगर 8) हनुमंतगाव) 10) हिंगणे कन्नड11) हिलालपूर / कोरडगाव 12) कनकसागज 13) कविटखेडा /बिरोळा 14) कोल्ही 15) खरज / तितरखेडा 16) खिर्डी हरगोविंदपूर 17) माळीघोगरगाव 18)नादी 19) नांदूरढोक / बाभुळगावगंगा 20)पाराळा 21) पुरणगाव 22) रोटेगाव 23) टुनकी 24) तिडी मकरमतपूरवाडी 25) वांजरगाव