वैजापूर – गंगापूर तालुक्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यातून 300 क्यूसेसने पाणी सोडले

जफर ए.खान

वैजापूर,२८ मार्च :-औरंगाबाद विभागातील वैजापूर व गंगापूर हे दोन्ही तालुके टंचाईग्रस्त असल्यामुळे या दोन्ही तालुक्यांसाठी नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून रब्बी हंगामासाठी आज सायंकाळी सहा वाजता 200 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.बुधवारी सकाळी हे पाणी वैजापूर तालुक्यात पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यातून सिंचनासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय क्षेत्र मंजूर आहे. वैजापूर तालुका – 40,150 हेक्टर (लाभार्थी गावांची संख्या- 49), गंगापूर तालुका- 27,907 हेक्टर (लाभार्थी गावांची संख्या – 46) व  कोपरगांव तालुका -2,429 हेक्टर (लाभार्थी गावांची संख्या – 07) अशा एकूण 102 गावांतील 52, 864 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी या कालव्याचे पाणी देण्याचे प्रस्तावित आहे.

नांदूर-मधमेश्वर कालव्यास रब्बी हंगामाचे पाणी आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कालवा सल्लागार समितीचे सदस्य बाबासाहेब पाटील जगताप व अंकुश पाटील सुंब यांनी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याकडे केली होती.

आ.बोरणारे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेतली व यासंदर्भात नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता गुजरे यांच्याशी संपर्क साधला व रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्याची त्यांना पत्राद्वारे विनंती केली.त्यानुसार सोमवारी (ता.28) सायंकाळी सहा वाजता नांदूर- मधमेश्वर जलद कालव्यातून तीनशे क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी हा वेग 500 क्यूसेस इतका वाढविण्यात येईल.अशी माहिती सूत्रांनी दिली.

वैजापूर तालुक्यातील 49 गावांतील 25, 894 हेक्टर व गंगापूर तालुक्यातील 46 गावांतील 16, 404 हेक्टर व कोपरगांव तालुक्यातील 07 गावांतील 1,562 हेक्टर अशा एकूण 102 गावांतील 43,860 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी आवर्तन मिळणार आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी व फॉर्म भरून मदत व सहकार्य करावे असे आवाहन कालवा सल्लागार समितीचे सदस्य बाबासाहेब पाटील जगताप यांनी केले आहे.