समृध्दी महामार्गाची शिंदे – फडणवीस यांच्याकडून पाहणी ; वैजापूर तालुक्यात स्वागत

काही मिनिटातच आटोपली पाहणी…

जफर ए. खान 

वैजापूर, ४ डिसेंबर :- राज्य सरकारच्या महत्वकांक्षी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे रविवारी (ता.04) नागपूर ते शिर्डी महामार्गाची पाहणी केली. पाहणी दरम्यान या महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जाबरगांव येथे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

समृध्दी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या 529 कि.मी.च्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. वैजापूजवळ जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावर मंडप टाकून शिंदे-फडणवीस यांच्या सत्कार करण्याचे नियोजन शिंदे गट व भाजपाने केले होते.उपमुख्यमंत्री  फडणवीस चालवत असलेल्या बुलेटप्रुफ गाडीत विराजमान झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे पाचच्या सुमारास नियोजित ठिकाणी आगमन झाले.

केवळ पाचच मिनिटात शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी,माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हारतुरे स्वीकारत त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या सर्वांची निराशा झाली.‌ वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नियोजन केल्याने त्यांचे मनोगत ऐकता येईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.‌ कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे ते आले, त्यांनी पाहिले व त्यांनी जिंकले असे वातावरण होते.‌

या दौऱ्यात शिंदे- फडणवीस यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आ.प्रदीप जयस्वाल उपस्थित होते.‌ बाबासाहेब जगताप, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, श्रीकांत साळुंके, साहेबराव औताडे, डॉ. राजीव डोंगरे, डॉ. निलेश भाटीया, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, शांतीलाल पहाडे, सुलभा भोपळे, सुप्रिया व्यवहारे, पद्माबाई साळुंके, ज्ञानेश्वर ठेके, प्रभाकर गुंजाळ आदींनी सत्कार केला.‌ तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याबाबत साहेबराव औताडे, खुशालसिंह राजपूत, प्रभाकर गुंजाळ व सोन्याबापु झिंझुर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.