मतदार यादी विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान ; वैजापूर येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४  या अर्हता दिनांकावर छायाचित्रासह आधारीत मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघात १ जुलै २०२३ अखेर ३ लाख ४ हजार ७२९ इतके मतदार आहेत.त्यात १ लाख ६० हजार २४३ पुरूष व १ लाख ४४ हजार ४८६ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

या सर्व मतदारांची नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना घरोघरी भेटी देऊन पडताळणी करावयाची आहे.  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी   यांना त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांच्या तपशीलाची   पडताळणी संबधीत कुटूंब प्रमुखाकडून करुन घ्यावयाची आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी इतर माहिती देखील  गोळा करावयाची आहे. त्यामध्ये नोंदणी न केलेले पात्र मतदार ( १ जानेवारी २०२३ रोजी पात्र),संभाव्य मतदार (१ जानेवारी २०२४ रोजी पात्र तसेच १ एप्रिल,१ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या  तीन अर्हता दिनांकावर पात्र), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार याची माहिती गोळा करुन फॉर्म ७ भरुन घेणे.मतदार यादीतील दुरुस्ती (फोटो, नाव, लिंग व पत्ता) 

घरोघरी भेटी देत असतांना ग्रामीण व शहरी भागाकरीता पुढील प्रमाणे मतदार यादी शुध्दीकरण गट तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यात गावातील तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक व गावातील एक वरिष्ठ नागरीकाचा समावेश असणार आहे.

वैजापूर तालुक्यातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांना  जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील कार्यालयातील नायब तहसीलदार हेंमत तायडे व सुजित राजपूत यांनी प्रशिक्षण दिले. पंचायत समिती कार्यालयाच्या  सभागृहात हे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी 

डॉ.अरुण जऱ्हाड, तहसिलदार  सुनील सांवत,नायब तहसीलदार के.जे.कुलकर्णी, निवडणूक विभागाचे  संदीप शेळके, प्रविण पंडीत, नितीन गवळे, डी.एस. वांळुज आदी उपस्थित होते.