आरटीओची वाहने इन्शुरन्सविना रस्त्यावर ; मोटार वाहन कायदा फक्त सामान्य वाहनधारकांसाठीच का ?

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहने इन्शुरन्सविना रस्त्यावर धावत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका वाहनाचा 12 वर्षांपासून तर दुसर्‍या वाहनाचा दोन वर्षांपासून इन्शुरन्स नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोटारवाहन कायदा फक्त काय सामान्य वाहनचालकांसाठीच आहे का? असा थेट सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या पथकाने 12 जूलै रोजी वैजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण शेकडो वाहने पकडून कागदपत्रांमध्ये अनियमितता व त्रुटी आढळून आल्याने वाहनांविरुध्द दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे आरटीओंच्या वाहनांना दंड कोण करणार? हा एक यक्षप्रश्न आहे. 

 छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने  12 जूलै रोजी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळपर्यंत वाहने पकडून कारवाई केली. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई भलीही  स्वागतार्ह असेलही. परंतु जे परिवहन कार्यालय सामान्यांना मोटारवाहन कायद्याचे डोस पाजतात. तेच जर हे नियम पायदळी तुडवून ‘ऐसी की तैसी’ करीत असेल तर याला काय म्हणावे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 12 जूलै रोजी परिवहन विभागाचे दोन पथके एम. एच.04 ई.पी.2020 व एम.एच.04 ई. पी. 2200 या क्रमांकाच्या बोलेरो वाहनांतून वैजापूर येथे दाखल झाले. यातील अनुक्रमे पहिल्या वाहनाच्या इन्शुरन्सची मुदत 29 जून 2011 रोजी तर दुसर्‍या वाहनाची इन्शुरन्स मुदत 10 जूलै 2021  रोजी संपल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन्हीही वाहनांच्या पीयूसी संपलेल्या आहेत. शासनाचे अधिकृत असलेल्या एम परिवहन या अॅपच्या माध्यमातून ही खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान आपल्या वाहनांसंदर्भात तक्रार होईल. या धास्तीने संबंधित अधिकाऱ्यांनी 13 जूलै रोजी वाहनांची पीयूसी काढून कातडीबचाव धोरण स्वीकारले आहे.  तशी माहितीही  या अॅपवर दाखवित असले तरी इन्शुरन्स मात्र अजूनही भरलेला नाही. 12 जुलैपर्यंत वाहनांची पीयूसी नव्हती. परिवहन विभागाने मोटारवाहन कायदा सामान्यांसाठी कडक केले खरे. परंतु इथे दिव्याखालीच अंधार असल्याचे उघड झाल्याने परिवहन विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने त्यांना कोण व किती दंड करणार? या नियमातून या विभागाला सूट देण्यात आली आहे का? नसेल तर मग कारवाई कधी होणार? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.याबाबत येथील राहुल लांडे यांनी परिवहन मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.   

वाहन चक्क झेब्रा काॅसिंगवर केले उभे

एकीकडे वाहनांचा इन्शुरन्स नसल्याचे उघड तर झालेच. परंतु हे पथक शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहन चक्क नाशिक -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील झेब्रा क्राॅसिंगवर उभे करून नाश्त्यावर ताव मारला. एरवी सामान्य चालकांनी झेब्रा क्राॅसिंगवर वाहन उभे केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिस अथवा आरटीओ कायद्याचा बडगा उगारतात. त्यामुळे आरटीओंच्या वाहनांना सर्वच माफ आहे काय? असा सवालही उपस्थित केला आहे.