दिलासादायक! मान्सून यंदा लवकर येणार

१० दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

मुंबई ,६ मे /प्रतिनिधी :-महाराष्ट्रासह देशभरात यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. मात्र याबरोबरच एक आशादायक बातमी म्हणजे यावर्षी मान्सून १० दिवस आधीच म्हणजे २० किंवा २१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसांत देशाच्या उर्वरित भागात बरसणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट’ या संस्थेने वर्तवला आहे.

‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट’च्या अंदाजानुसार साधारण २० ते २१ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल. त्यानंतर २८ ते ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. सर्व व्यवस्थित राहिले तर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात, तर ११ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही सुवार्ता शेतकऱ्यांसह गरमीने त्रस्त झालेल्यांसाठी दिलासादायक आहे.

आतापर्यंतच्या अभ्यासानुसार, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज १४ एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. एकूण पावसाच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो.

भारतामध्ये शेती आधारीत उद्योग मान्सूनवर अवलंबून आहेत. एकूण पेरणी पैकी जवळपास ४० टक्के पेरणी क्षेत्र हे पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे.