जांबरगावच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी वैजापूर आगाराची बससेवा ; थेट गावात जाऊन विद्यार्थ्यांना सवलतीचे पास वाटप

वैजापूर ,१५ जून/ प्रतिनिधी :- शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वैजापूर आगाराने थेट गावात जाऊन त्यांना घरापासुनच सवलतीचे पास व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले व बसने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडण्यात आले. आगाराच्या वतीने बससेवा सुरु करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनीही कौतुक केले.

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव हे गंगापूर रस्त्यावरचे गाव असुन या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी वैजापुरात येतात. या विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन मंडळाच्या वैजापूर आगारातर्फे बस सेवा सुरु करण्यात आली. विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, कामगार अधिकारी आंबट, आगार प्रमुख किरण धनवटे यांनी विद्यार्थ्यांना पासचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच पंढरपुर येथे आषाढी एकादशीसाठी ग्रामीण भागातुन प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार बस सेवा देण्यात येईल असे विभाग नियंत्रक क्षिरसागर यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल पाडवी, आजिनाथ मुळे, बाविस्कर, भगवान गिरी, पंकज विसपुते, पंढरीनाथ जाधव, जनार्धन कोकाटे उपस्थित होते.