बाभूळगाव गंगा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन हायवा जप्त

वैजापूर ,२६ मे  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने गुरुवारी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक पकडले. या दोन ट्रकमधून दहा ब्रास वाळूची वाहतूक होत होती. पोलिसांनी वाहन चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गाड्यांचे कुठलेही कागदपत्र आढळले नाहीत. याशिवाय वाळू उपशाचा परवाना किंवा रॉयल्टी भरलेली नसतानाही वाळूची वाहतूक होत असल्याने पोलिसांनी दोन हायवासह वाळूच्या साठा असा एकूण 40 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास सिताराम त्रिभुवन (रा. साठे नगर) व अविनाश विष्णू गायकवाड (रा. कोपरगाव) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक सुरज बिघोत, हेडकॉन्स्टेबल आहेर, पाटील यांचे पथक वैजापूर उपविभागाच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती काढत असताना त्यांना बाभुळगाव येथून हायवा ट्रकमधुन वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी कोपरगाव रस्त्यावर सापळा रचून दोन वाहने पकडली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाही कुलदीप नरोडे हे करीत आहेत.