वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे खोदकाम सुरू असताना मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले

दीडशे वर्षांपूर्वीचे अवशेष असण्याची शक्यता 

वैजापूर ,२३ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर येथे नवीन तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु असतांना शुक्रवारी (ता.24) सायंकाळी मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले. सुमारे दिडशे वर्षांपुर्वीचे हे अवशेष असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना औत्सुक्याचा विषय ठरली आहे.

वैजापूर शहरात जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर मागील काही दिवसांपासून प्रशस्त नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास कामगारांना पायाच्या भिंतीमध्ये मानवी देहाचे अवशेष आढळुन आले. वैजापूर येथील जुनी तहसील कार्यालयाची इमारत ही जवळपास एकशे तीस वर्षांपुर्वीचे असून ही इमारत पाडण्यात आली आहे.‌

नविन इमारतीच्या पायाचे खोदकाम प्रगतीपथावर आहे.‌ पायासाठी जवळपास दहा फुटांचे खोदकाम केल्यानंतर पायाच्या भिंतीमध्ये कामगारांना मानवी देहाचे अतिशय जीर्ण अवस्थेतील अवशेष आढळुन आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने महसुल प्रशासनाला कळवले असून पोलिसांनाही कळवण्यात आले आहे. हे अवशेष अद्याप भिंतीमध्येच असून यावर कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार महसुल प्रशासनाला असल्याने तहसील कार्यालयामार्फत पंचनामा केल्यानंतरच याबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल. याबाबत शनिवारी प्रशासकीय कार्यवाही होण्याची शक्यता आहे.