गोदावरी व शिवना नदीतून विना रॉयल्टी वाळू उपसा ; दोन वाहने पकडली तहसीलदार सावंत यांची कारवाई

वैजापूर ,२३ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीच्या पात्रातून विना रॉयल्टी वाळुचा उपसा करुन वाहतूक करणारी दोन वाहने नव्यानेच पदभार स्वीकारलेले तहसीलदार  सुनिल सावंत यांच्या पथकाने पकडली. या दोन्ही वाहनातून एकुण चार ब्रास वाळुची चोरटी वाहतुक केली जात होती. ही वाहने हस्तगत करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात आल्याचे तहसीलदार सावंत यांनी सांगितले. 

गोदावरी व शिवना नदीच्या पात्रातुन रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसिलदारांनी मध्यरात्री बारा वाजल्याच्या सुमारास लासुरगांव येथे राजुरा रस्त्यावर विना क्रमांकाचे एक ब्रास वाळु घेऊन जाणारे ट्रॅक्टर पकडले. गणेश जाधव हा या ट्रॅक्टरमधुन वाळु घेऊन जात होता. हे ट्रॅक्टर लासुरगांव येथील तात्याराव गोडे यांचे असल्याचे चालकाने सांगितले. दुसऱ्या कारवाईत तहसिलदार सावंत, सुरक्षारक्षक पठाण व डागपिंपळगावचे कोतवाल यांनी तीन ब्रास वाळुची वाहतुक करणारे टिप्पर ट्रक (क्रमांक एमएच २० सीटी ५५०५) पकडले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास डागपिंपळगाव येथील पांढरे वस्ती जवळ करण्यात आली. या वाहनातुन दत्तु निंबाळकर हा गोदावरी नदी पात्रातुन बेकायदा वाळुची वाहतुक करीत होता. शिरसगाव येथील काकासाहेब खेड  यांचे हे वाहन असल्याचे चालकाने पथकाला सांगितले. विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.‌ बेकायदा वाळुचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार सावंत यांनी सांगितले.