औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक: 52 संस्थांची कर्जे निर्लेखित, 8.50 कोटींचा कर्जमाफी घोटाळा ; पुणे सीआयडीकडे तपास

जफर ए.खान

वैजापूर, १५ फेब्रुवारी:- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 8.50 कोटी रुपयांच्या कर्जमाफी घोटाळ्याची चौकशी राज्य गुन्हा अन्वेषण विभाग  (सीआयडी, पुणे) यांच्यातर्फे सुरू करण्यात आली असून, 52 सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जमाफीच्या घोटाळ्याचा तपास करण्यात येणार आहे. यासंदर्भात वैजापूर तालुक्यातील अवसायनात निघालेल्या पांच सहकारी संस्थांच्या संचालकांना गुन्हे अन्वेषण विभागाने 17 फेब्रुवारी रोजी तपासकामी औरंगाबाद कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
जिल्हा बँकेने 52 सहकारी संस्थांना 8 कोटी 50 लक्ष रुपयांची कर्जे माफ केली होती. या संस्था बंद पडल्या असून नोटीस बजावण्यासाठी त्यांचे पत्ते सापडत नसल्याचे कारण दाखवून ही कर्जे माफ करण्यात आली होती. कर्जे माफ करून अपहार केल्याची तक्रार सदाशिवराव गायके यांनी 2017 साली क्रांतीचौक पोलीस ठाणे औरंगाबाद येथे दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 9 ऑक्टोबर 2019 रोजी या कर्जमाफी घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपविला होता. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट ही करण्यात आले होते. याप्रकरणी बँकेच्या काही संचालकांचे जबाब ही घेण्यात आले होते. मात्र, सदाशिव गायके यांच्या मागणीनुसार तपास पुणे सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून याप्रकरणी ती आठवड्यानंतर सुनावणी होणार असल्याचे समजते.