संजय गांधी निराधार व अन्य योजनांची साडेचार हजार प्रकरणे मंजुरीसाठी पडून ; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वैजापूर तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

वैजापूर,५ जानेवारी /प्रतिनिधी :-संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजना समितीची गेल्या दोन वर्षांपासून बैठक न झाल्याने विविध योजनांची जवळपास साडेचार हजार प्रकरणे मंजुरीसाठी तहसील कार्यालयात धूळ खात पडून आहे. समितीची बैठक घेण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वैजापूर तहसील कार्यालयासमोर बुधवारी (ता.5) ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लखन त्रिभुवन, बुट्टे यांच्यासह संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व अन्य योजनेच्या लाभार्थी महिला व पुरुषांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. समितीची बैठक घेण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे श्री.शेळके यांनी सांगितले.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व  अन्य योजनेची जवळपास साडेचार हजार प्रकरणे समितीची बैठक न झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंजुरीविना पडून आहेत.वेळोवेळी पाठपुरावा करूनही समितीची बैठक घेण्यात आली नाही त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने समितीची तात्काळ बैठक घेऊन लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे.