सामाजिक न्याय विभागामार्फत 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर

गतिमान प्रक्रिया राबवून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री  धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिले मंजुरी आदेश

औरंगाबाद,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री  धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे या योजनांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहे. त्यामुळे विभागाने  गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करत या वर्षी  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा शंभर टक्के कोटा पुर्ण केला आहे. कोरोना काळातही सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती मंजूरीची प्रक्रीया जलदगतीने राबविल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या  विद्यार्थ्यांच्या  मुळ कागदपत्रे तपासणी व त्यांना अंतिम मजुरी आदेश देण्याबाबत नुकतेच शिबीर आयोजित करण्यात आले होते.

श्री. मुंडे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात सुधारणा केल्याने 2003 नंतर प्रथमच योजनेचा कोटा शंभर टक्के पूर्ण झाला व गरजू विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाली याचे समाधान आहेच त्याचबरोबर एकूण लाभार्थी संख्या 75 वरून 200 करण्याचा आमचाही मानस असल्याची भावना व्यक्त केली. तर जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण भासू नये. त्यांना वेळेत परदेशात जाता यावे. जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कुठलाही बाधा येऊ नये. यासाठी विभागाने गतिमान पद्धतीने यावर्षी शिष्यवृत्ती मंजूर केली असल्याचे  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी यावेळी सांगितले.

 दरवर्षी असंख्य  विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य  कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरीच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चितच तणावात असतात, त्यामुळेच त्यांचा ताण कमी झाल्याने विद्यार्थी निश्चिंत झाले आहे. त्यांचा परदेशाचा प्रवास सुखकर होणार असल्याचे त्यांनी कागदपत्र तपासणी शिबिरात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

“ सर माझे वडील मजुरी करतात, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत शिक्षणासाठी जाईल. ते शक्य झाले आहे समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन, यावर विश्वासच बसत नाही ” ही भावना आहे, लंडन येथे मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयाचे संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या भंडाऱ्याची शिवानी वालेकर या विद्यार्थीनीची.

            “ सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खेडेगावात गाई-म्हशींचे पालन-पोषण करून शेण-मातीचे कामाबरोबरच पडेल ते काम केले. अदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने पाण्यासाठी एक दोन किलोमीटर रोजची वणवण अश्या परिस्थिती कुटूंबाच्या उदर्निर्वाहासाठी प्रयत्न करत शिक्षण सोडले नाही, व समाज कल्याण विभागाची शिष्यवृतीच्या पुण्याई मुळेच वाडीव-हे  जिल्हा नाशिक  ते वाशिंग्टन हा माझा प्रवास हा हजारो विद्यार्थासाठी मार्गदर्शक ठरल्यास जीवनाचे सार्थक होईल ,” अशी भावुक प्रतिकिया होती, नाशिकच्या चारुदत्त म्हसदे यांची. एम.टेक झालेले चारुदत्त यांची  अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठात मानवी शरिरातील विविध भागासाठी लागणा-या उपक्रमांचा शोध व त्यात सुधारणा या विषयावर संशोधनासाठी निवड झाली आहे.

            तर अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विकासने वडिलांना चहा टपरी चालवण्यास मदत करुन शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठाच्या व बाबासाहेबांचे गुरु असलेले जॉन डुई  हे संस्थापक असलेल्या टीचर्स कॉलेजमध्ये  जगातील शिक्षण पध्दतीवर संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या अमरावतीच्या विकास तातड या विद्यार्थ्यांची भावना तर नक्कीच डोळ्यात पाणी आणते. 

            असे एक नाही तर अनेक विषयात प्राविण्य मिळविलेले सर्वसामान्य कूटुंबातील विद्यार्थी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त करत होते. जणू हा कौटुंबिक सोहळा असून विद्यार्थी आपली सुखदुःखे एकमेकांशी व शासकीय अधिकारी यांच्याशी अदान प्रदान करत होते.

शिष्यवृत्ती मंजुरीचे अंतिम आदेश हातात मिळाल्याने विद्यार्थ्यां बरोबर पालकांनाही सुखद धक्का बसला. सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांच्या कृतिशील निर्णयांमुळे तसेच सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य प्रधान सचिव अरविंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त प्रशांत नारनवरे  यांनी या वर्षाची  ही योजना मार्गी लावली.