ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, ५ जानेवारी /प्रतिनिधी:- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन देवून वित्त विभागाशी संबंधित विषयांबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने बिंदू चौकात आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, किमान वेतन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती, 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांना मेहनताना देणे आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.