पीडितेवर अत्त्याचार :ज्योतिराम धोंगडेच्या कोठडीत आता शुक्रवारपर्यंत वाढ

औरंगाबाद,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :- न्यायालयात शरण आलेल्या ज्योतिराम धोंगडे याच्या पाच दिवसाच्या पोलिस कोठडीच्या कालावधीत पोलिसांनी फक्त त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याच्या घरातून एक मोबाईल भ्रमणध्वनी जप्त केला. अद्याप त्याच्याकडून पिस्टल, सोन्याचे दागिणे आणि कोट्यवधी रुपये जप्त करणे बाकी आहे. त्याने पीडितेस दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांबाबत शोध घ्यायचा असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी धोंगडे याची आणखी चार दिवस पोलिस कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने तीन दिवस कोठडी वाढवून दिली.
१० सप्टेंबर २२ रोजी मुकुंदवाडी पोलिस स्टेशन येथे ज्योतीराम धोंगडे याच्यावर पीडितेवर अत्त्याचार केल्याबाबत तसेच पैसे व दागिणे उकळल्याबाबत, पिस्टलचा धाक दाखवून गर्भपात केल्याबाबत भादंविचे कलम ३७६(२)(एन), ३०७, ४२०, ३१३, ३२३, ५०६ अन्वये तसेच शस्त्र अधिनियमचे कलम ४, २५ नुसार आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, यानंतर ज्योतिराम पसार झाला आणि त्याने सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जंग जंग पछाडले. परंतु, न्यायालयात त्याची डाळ न शिजल्याने अखेर तो न्यायालयाला शरण आला. त्यानंतर त्याची हर्सुलला रवानगी करण्यात आली. नंतर मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला ताब्या घेऊन पोलिस कोठडी मागितली. चार दिवसाची कोठडी संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे व सरकारी अभियोक्त्यांनी न्यायालयात माहिती दिली की आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याचे घरातुन एक भ्रमणध्वनी जप्त केला आहे. आता आरोपीने गुन्ह्यात वापरलेले पिस्टलबाबत विचारपुस करून ते जप्त करायचे आहे, आरोपीने फिर्यादीची फसवणुक करून तिच्याकडून घेतलेले सोन्याचे दागिने व पैशाबाबत विचारपुस करून ते जप्त करणे आहे, आरोपीने फिर्यादीस गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे तक्रारीत नमुद असून आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या कोठुन व कोणाकडुन मिळविल्यात या बाबत तपास करणे आहे. सदर गुन्हा करतेवेळी आरोपीस प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरित्या कोणी मदत केली आहे काय याबाबत आरोपीकडे विचारपुस करून गुन्ह्याचा तपास करायचा आहे, त्याकरता पोलिस कोठडी आवश्यक आहे.
पीडितेतर्फे अ‍ॅड्. संदीप बी. राजेभोसले यांनी युक्तीवाद केला की, आरोपी ज्योतिराम तपासकामी सहकार्य करीत नसून आजपर्यंतच्या पोलिस कोठडीत पोलीस हे गुन्ह्यात वापरलेले हत्यार व फिर्यादीचे सोने आरोपीकडून जप्त करू शकलेले नाहीत त्यामुळे आरोपीच्या वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. तर आरोपी तर्फे अ‍ॅड्. सचिन शिंदे यांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा कायद्याचे अनुपालन करणारा असून तो स्वतः न्यायालयात शरण आल्याने तसेच पोलिसांना तपासासाठी पोलिस कोठडीचा पुरेसा अवधी मिळालेला असल्याने आता वाढीव पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही. उभय युक्तीवादानंर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी ज्योतिराम याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अ‍ॅड. संदीप बी. राजेभोसले यांना अ‍ॅड्. सुधीर घोंगडे, प्रशांत गायकवाड, चैतन्य देशमुख, गौरी एस. राजेभोसले सहकार्य करत आहेत.