बॅनर फाडल्याप्रकरणी राडा :सहा आरोपींचा नियमित जामीन अर्ज नामंजूर 

छत्रपती संभाजीनगर,१५ एप्रिल /प्रतिनिधी :-जटवाडा रोडवरील ओहरगावात बॅनर फाडल्याप्रकरणी दोन गटात झालेल्या राड्यात सहा आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एम. सुंदाळे यांनी नामंजूर केला.फेरोज बाबु खान पठाण (४१), शहाबाज खान पठाण (१९), इम्रान पठाण दैालतखॉं पठाण (२९), मिनाबाई सुरेश नलावडे (४०), नर्मदाबाई नवनाथ फुके (३७) आणि वनिता अशोक पडुल (३०, सर्व रा. ओहरगाव, जटवाडा रोड हर्सुल) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍ह्यात यापूर्वी काही आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज न्‍यायालयाने नामंजूर केलेला आहे. आरोपींच्‍या साथीदारांना अटक करयची आहे. गुन्‍ह्यात वापरलेली हत्‍यार हस्‍तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्‍हा जातीय दंगल उसळण्‍याची शक्यता नाकरता येत नसल्याने सहायक सरकारी लोकाभियोक्ता बी.एन. अढावे यांनी आरोपींच्‍या जामीन अर्जाला विरोध केला होता.

जटवाडा रोडवरील ओहरगावात ३० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास गावातील रोडच्‍या कडेला लावलेले बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र ते प्रकरण आपसात मिटवण्‍यात आले. दुसर्या दिवशी ३१ मार्च रोजी सकाळी बॅनर फाडण्‍याच्‍या कारणावरुन दोन्‍ही गट समोरा-समोर येवून जोरदार भांडण झाली, दगडफेक करण्‍यात आली. प्रकरणात दोन्‍ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हर्सुल पोलिस ठाण्‍यात परस्‍पर विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.