पाझर तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू ; मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबावर काळाचा घाला

वैजापूर ,१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- पाझर तलावात बुडून सख्या बहीण-भावाचा करून अंत झाला.ही दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथे रविवारी(ता.31) दुपारी घडली.
रितू सीना डावर(12 वर्ष) व सचीन सीना डावर (8वर्ष) अशी मृत झालेल्या बहीण – भावाची नावे असून ते परप्रांतीय आहेत.मध्यप्रदेशातील बडवाण जिल्ह्यातील जमूळ गावचे रहिवाशी असलेले सीना डावर हे आपल्या कुटुंबियासह मोलमजुरीकरण्यासाठी शिऊर परिसरात आलेले आहेत.

सफियाबादवाडी येथील शेतकरी नारायण पुंडलिक जाधव यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम ते करीत होते.सीना डावर हे आपल्या पत्नी व दोन मुलींसह सकाळी कामावर गेले होते.मुलगा सचीन हा मतिमंद असल्याने त्याची मोठी बहीण रितू हिला त्याच्यासोबत ठेवले होते. बहिणीची नजर चुकवून सचीन शेजारी असलेल्या पाझर तलावाकडे गेला व पाय घसरून तलावात पडला बहीण रितू हिच्या लक्षात येताच ती भावाकडे धावली.भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात तीही पाण्यात बुडल्याने दोघांचाही मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे, फौजदार अंकुश नागटिळ,पो.कॉ.अमोल मगर,जाधव,नारोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले.या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फौजदार अंकुश नागटिळक हे अधिक तपास करीत आहेत.