समृध्दी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली ; एक वर्षाचा चिमुकला ठार तर पाच जण जखमी

वैजापूर ,​१०​ जून/ प्रतिनिधी :- हज यात्रेसाठी मुंबई येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ जांबरगाव ते लासुरगांव दरम्यान भीषण अपघात झाला.‌ या अपघातात एक वर्षांचा चिमुकला ठार झाला तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींवर वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर येवला येथे हलविण्यात आले आहे. 

या घटनेत अख्तर रझा हा एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला तर आझाद अली खान (४९), अफताब अली (२४),  खुशबू आलम खान (२६), यास्मिन खान (१८), सोहेल आलम खान (३०) सर्व राहणार वाशी, मुंबई हे गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की खान कुटुंब हे मुळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून सध्या वाशी, मुंबई येथे स्थायिक झाले आहे. गया येथून १७ जुन रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी छप्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना जांबरगाव व लासुरगांव दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या दुभाजकामध्ये उलटली. गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला व गाडीतील भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर येथुन माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी रुग्णवाहिकेसह आपले सहकारी इराज शेख, धीरज साळवी यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बढे, कृष्णा राठोड, उपनिरीक्षक गोरे, हेड कॉन्स्टेबल शेख यांनीही मदतकार्य केले.