३० वर्षांची पत्रकारितेची तपश्चर्या, अचूक वेळेत, योग्य वार्तांकन, विजय चौधरी यांना उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार प्रदान

खुलताबाद: : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा ‘उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार’ महाराष्ट्र टाइम्सचे खुलताबाद तालुका प्रतिनिधी विजय चौधरी यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. फ.मुं. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, सहसंचालक तंत्र शिक्षण नागदेवे उमेश, सरस्वती भुवनचे प्राचार्य डॉ मकरंद पैठणकर  उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भारत कदम यांची प्रमुख  उपस्थिती होती. 

विजय चौधरी हे गेली ३० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून दैनिक महाराष्ट्र  टाइम्सचे खुलताबाद तालुका प्रतिनिधी म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. सन २०२२ मध्ये निवडणूक कार्यालयाने राबविलेल्या उपक्रमांना कार्याला उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दल उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका आदींशी संबंधित बाबींचे उत्कृष्ट वार्तांकन यासाठी पत्रकार तसेच मतदार जागृतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्यासाठी यंदापासून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पुरस्कार प्रदान केले आहेत.  लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संर्स्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेवून पत्रकार आणि सामाजिक संस्थांना हे पुरस्कार जाहीर केले आहेत. 

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधीच्या माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जात आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मतदार मित्र पुरस्कार देण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “राज्यस्तरीय चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार” देऊन विजय चौधरी यांना पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. पत्रकार दिनाच्या औचित्याने अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात विविध विषयांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना चौथास्तंभ पुरस्कार देण्यात येतो. अतिशय प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा हा पुरस्कार असतो. यंदाचा पुरस्कार विजय चौधरी यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.  चौधरी यांना ‘उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार’ मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.