औरंगाबादमध्ये फटाके फोडताना १६ मुलांच्या डोळ्यांना दुखापत

औरंगाबाद : दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद येथे फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनेतील जखमींचा आकडा आता वाढला असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ मुलांच्या डोळ्याला आणि चेह-याला इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

फटाके फोडताना या मुलांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या सर्व १६ मुलांना उपचारासाठी जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या सर्व मुलांवर उपचार करुन त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मुलांच्या डोळ्यांना, हातांना आणि चेह-याला इजा झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये एका १० वर्षाच्या मुलाला गंभीर इजा झाली होती. त्याच्यावर उपचार करुन मंगळवारी सकाळी त्याला घरी पाठवण्यात आले.

तसेच  चिकलठाणा परिसरात देखील एका चार वर्षांच्या मुलीला फटाके फोडताना इजा झाली होती. तिच्यावर देखील परिसरातील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान इतर मुलांना किरकोळ इजा झाल्या असून त्यांना देखील उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे फटाके फोडताना पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.