औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची तयारी पूर्ण:आज मतदान 

सर्व मतदान पथके साहित्यासह मतदान केंद्रस्थळी

औरंगाबाद,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथके  साहित्यासह मतदान केंद्रावर पोहचली आहेत. निवडणुकीसाठी जिल्हानिहाय पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

                  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान उद्या 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. विभागात असलेल्या 227 मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक कोणत्याही प्रकारची वस्तु घेऊन जाता येणार नाही. मतदान केंद्रावर अखंडीतपणे व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने विभागातील सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना

1.      मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन यांचा वापर करू नये.

2.      ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात “१” हा अंक नमूद करून मतदान करावे.

3.      उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम २, ३, ४ इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.

4.    कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करू नये.

5.     पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. १,२,३, इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.

6.      अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III, इत्यादी किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.

7.     मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये.

8.     तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर (v) किंवा (X) अशी खुण करू

नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल.

9.      तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर “१” हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत.

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

                  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे. या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

                  1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या  मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

                  मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या मताची सरमिसळ करुन मतमोजणी होणार असल्याने मतदाराचे मत गोपनीय राहणार आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.