महाविकास आघाडीची ही वज्रमूठ :तिला कुणीही तोडू शकत नाही-अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  आज महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ही मन की बात नाही, दिल की बात आहे. महाविकास आघाडीची ही वज्रमूठ आहे. तिला कुणीही तोडू शकत नाही. जे राहिले आहेत ते एकदिलाने सोबत आहेत. आपलं सरकार जायला नको होतं. काय कमी केलं होतं उद्धजींनी? आम्ही सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे. आमच्या मनात किंतू, परंतू नव्हतं. परंतु अडीच वर्षांच्या कारकीर्दीला नख लावण्याचं काम केलं. उद्धवजींच्या पाठीत खंबीर खुपसला आणि सरकार गेलं.

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपला रोखायचं असेल तर तिन्ही पक्षांना आता एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. सध्या असलेलं सरकार पक्षांतर बंदी कायदा पायदळी तुडवून स्थापन झालेलं आहे. मागे कधीच झालं नाही ते मागच्या सहा महिन्यामध्ये झालं आहे.

राहुलजींनी अदाणींच्या बाबतीच लोकसभेत प्रश्न विचारले होते. परंतु राहुलजींना बोलू दिलं जात नव्हतं. राज्यसभेतही मल्लिकार्जून खर्गे यांना बोलू दिलं जात नाहीये. मात्र त्यांचा आवाज बंद करण्यासाठी राहुलजींची खासदारकी रद्द करण्यात आली. आवाज दाबण्याचं काम देशामध्ये सुरु आहे. हा विषय केवळ राहुल गांधी यांच्यापुरतं मर्यादित नाही. राष्ट्रवादीच्या सदस्याबाबतही असंच झालं होतं. परंतु कोर्टातून त्यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. हे चालणार आहे का? जनतेचा कौल काय आहे हे आता लक्षात येत आहे.

आगामी काळात देशात लोकशाही टिकवायची आहे का नाही? हाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सर्वांनी असंच एकत्र राहुल इथून पुढे भाजपशी लढा द्यायचा आहे, असं विधान अशोक चव्हाण यांनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना अशीच वज्रमूठ ठेवायची का? असा प्रश्न उपस्थित केला. उपस्थितांनी एकसुरात होकारार्थी कौल दिला.