आदिवासी बांधवांना शासन नियमानुसार योग्य न्याय देणार – जिल्हाधिकारी चव्हाण

औरंगाबाद ,१४ मार्च  /प्रतिनिधी :-आदिवासी बांधवांना  शासनाच्या  निर्णयातील नमूद नियमांनुसार योग्य तो न्याय देण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेटावयास आलेल्या आदिवासी बांधवांना दिले.

Displaying DSC_8293.JPG

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा,  शेत मजूर युनियन व सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या  विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक सचिन शिंदे, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे  किशोर ढमाले, भीमराव बनसोड, रावजी पथवे, रतन मधे आदींसह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, शेतमजूर युनियन व सत्यशोधक शेतकरी सभेचे सभासद उपस्थ‍ित होते.

कन्नड, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, खुलताबादमधील वनहक्क दावे दाखल केलेल्या वनहक्क दावेदारांवर वन खात्यांकडून बेकायदेशीरपणे शेती, घरे,  विहिरी उद्धवस्त करण्याची कारवाई होत आहे, असे आदिवासी बांधवांतर्फे श्री. ढमाले यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. तसेच मागण्यासंदर्भात शिष्टमंडळाने निवेदनही जिल्हाधिकारी यांना  दिले.

आदिवासी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर  महसूल व वन विभागांच्या निर्णय, कलमानुसार योग्य ती कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी बांधवांना जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी दिले.  जिल्हाधिकारी यांनी आदिवासींच्या मागण्यांची योग्य दखल घेतल्याबद्दल शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचे आभारही  मानले.