शेंद्रा एमआयडीसी, ऑरिक सिटीचा भाग पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात समाविष्ट करावा

आमदार संजय शिरसाट यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
Displaying IMG_7153.JPG

औरंगाबाद, दिनांक 05:आमदार संजय शिरसाट यांनी शेंद्रा एमआयडीसी, ऑरिक सिटीचा भाग पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात समाविष्ट करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी निवदेनात म्हटले आहे की, औ.बाद शहर आयुक्तालयाचा पोलीस कार्यक्षेत्रालगत पंचतारांकित शेंद्रा एम.आय.डी.सी परिसरासह बराचसा भाग हा पोलीस अधिक्षक, औ.बाद ग्रामीण यांचे अधिनस्थ असलेल्या चिकलठाण्याच्या पोलीस ठाणे हद्दीत व काही भाग करमाडच्या पोलीस ठाणे हद्दीत मोडतो. त्यामुळे पंचतारांकित शेंद्रा एम.आय.डी.सी., ऑरिक सिटी हा परिसर पोलीस आयुक्तालय, संभाजीनगर (औ.बाद) शहर यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करणे गरजेचे आहे.

तसेच, याठिकाणी नेहमी औद्योगिक क्षेत्राची वाढ होते. या औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील मोठी वसाहत आहे. त्यामुळे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी व आम्ही लोकप्रतिनीधींनी या क्षेत्राचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्यात यावा, अशी मागणी याआधी तत्कालीन माजी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. येथील नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन चिकलठाणा कार्यक्षेत्रातील सर्व गावे, करमाड पोलीस ठाण्याचा काही भाग पंचतारांकित शेंद्रा एम.आय.डी.सी, ऑरिक सिटी हा परिसर पोलीस आयुक्तालय, औ.बाद शहर यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करतो, असे आमदार संजय शिरसाट यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलीस आयुक्तालयास २ अतिरिक्त पोलीस उपआयुक्तांची आवश्यकता

आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) संभाजीनगर (औ.बाद), पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा) हे दोन पदे निर्माण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी निवेदनात म्हटले की, औ.बाद शहरातील पोलीस आयुक्तालयाचे बहुतांश क्षेत्र हे औद्योगिक व वसाहतीचे, धार्मीक, पर्यटन, शैक्षणिकदृष्ट्या अतिमहत्वाचे क्षेत्र आहे. तसेच, येथे औद्योगिक कारखाने दळणवळण साधने, विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, वैद्यकिय उपचार केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत. हे अतिशय झपाट्याने वाढणारे शहर असून या शहरावर पोलीसांचा गुन्हेगारावर वचक रहावा, यासाठी पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा), पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा) ही दोन्ही पदे निर्माण केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.