मनसेचे नवे घोषवाक्य ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’

पुणे : राज ठाकरे यांची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम सुरु झाली आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

याआधी मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्याने मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे. यापूर्वी पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरे यांनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य दिले होते. आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ या मुद्यावर मनसेला पुन्हा सूर गवसणार का, याची आता उत्सुकता आहे.