धाराशिव साखर कारखान्यासह राज्यात २४ ठिकाणी आयकर विभागाची धाड

उस्मानाबाद : धाराशिव साखर कारखान्यासह राज्यात २४ ठिकाणी आयकर विभागाची धाड पडली असुन पहाटेपासुन कागदपत्राची पाहणी करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात अभिजीत पाटील यानी वेगवेगळे कारखाने विकत घेतल्याने कमी वेळामध्ये त्यांची साखर सम्राटांमध्ये गणना होऊ लागली होती. त्यांच्याच कारखान्यावर आता धाड पडल्याने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे दिसुन येत आहे. पंढरपुर विधानसभा निवडणुकीपासुन राजकीय दृष्ट्याही त्यांची शक्ती वाढल्याचे दिसुन आले होते.

सर्व कर्मचारी व महत्वाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईलही बंद करण्यात आल्याचे दिसत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घराचीही चौकशी यावेळी करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत जिल्ह्यातील आयकर विभागाला विचारले असता त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही धाड वरिष्ठ विभागाकडुन पडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे मुळचे पंढरपुरचे आहेत,सूरुवातीला वाळुच्या व्यवसायामध्ये त्यानी पाय रोवले. त्यानंतर तिथुन त्यानी कारखानदारीमध्ये शिरकाव केला पहिल्यांदा धाराशिव व त्यानंतर अनेक कारखाने त्यानी विकत घेतले आहेत. फार कमी वेळामध्ये त्यांचा राज्यातील मातब्बर साखर कारखानदाराच्या यादीमध्ये समावेश झाला होता. याशिवाय पंढरपुर विधानसभेची पोटनिवडणुक झाली त्यावेळी त्यानी लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती. नुकताच त्यानी पंढरपुर येथील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा विठ्ठल कारखान्याची निवडणुक एकतर्फी जिंकुन आपला राजकीय दबदबा वाढविला होता.

या सगळ्यामध्ये त्यांचे राष्ट्रवादी व जेष्ट नेते शरद पवार यांच्याशी अत्यंत चांगले सबंध निर्माण झाल्याचे दिसुन आले होते. मात्र राजकीय दृष्ट्या त्यानी अजुनही कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्विकारलेले नव्हते. सध्या राजकीय विरोधकावर सत्ताधारी विविध यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा जाहीर आरोप होत असल्याने या धाडीबद्दलही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जिल्ह्यात सूरु झाली आहे. त्यात शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे अभिजीत पाटील हे भाचे असल्यानेही राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.