आजोबाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी नातवाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दहा हजारांचा दंड

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-आजोबाला मारहाण केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्‍यायालयाने ठोठावलेल्‍या शिक्षेत अंशतः बदल करून आरोपी नातवाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दहा हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी गुरुवारी दि.१७ ठोठावली. विशेष म्हणजे आरोपी नातवाला ठोठावलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन आजोबाला देण्‍यात यावेत असे देखील आदेशात नमुद करण्‍यात आले आहे. इश्‍वर शिवाजी काळे (३२, रा. बळीराम पाटील हायस्‍कुल जवळ एन-९ सिडको) असे आरोपी नातवाचे नाव आहे.

प्रकरणात रामराव पाटीलबा काळे (८२, रा. सालुखा, खुलताबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २९ नोव्‍हेबर २०१० रोजी फिर्यादी रामराव काळे हे सराई येथील एसबीआय बँकेत पैसे काढण्‍यासाठी गेले होते. दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास फिर्यादी बँकेतून आपल्या घराकडे परतत असताना तेथे सुन विठाबाई ऊर्फ मिराबाई शिवाजी काळे (४८) आणि तिचा मुलगा तथा आरोपी इश्‍वर काळे असे दोघे दुचाकीवर आले. त्‍यांनी फिर्यादीला थांबवून आरोपी इश्‍वर याने बँकेत कशासाठी गेले होते अशी विचारणा केली, त्‍यावर फिर्यादीने पैसे काढण्‍यासाठी गेले होतो असे सांगितले. त्‍यामुळे चिडलेल्या इश्‍वरने फिर्यादीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तर विठाबाई ऊर्फ मिराबाई हिने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या प्रकरणात खुलताबाद पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी खुलताबाद न्‍यायालयाने सुनावणीनंतर आरोपी इश्‍वर आणि त्‍याची आई विठाबाई ऊर्फ मिराबाई या दोघांना दोषी ठरवून भादंवी कलम ३२६ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंड तसेच कलम ३२४ अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच तीन हजार रुपये नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे आदेश दिले.

या शिक्षे विरोधात आरोपींनी सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले. अपीलाच्‍या सुनावणीअंती न्‍यायालयाने आरोपीचे वय लक्षात घेवून शिक्षेत अशंत: बदल केला. त्‍यानूसार आरोपी इश्‍वर काळे याला भादंवी कलम ३२४ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दहा हजारांचा दंड ठोठावला. तर विठाबाई ऊर्फ मिराबाई काळे हिची मुक्तता केली. प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी काम पाहिले.