नांदेड जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ६६ कोटींची मंजुरी

खा.चिखलीकर यांचा पाठपुरावा सुरूच ,नव्या ४७ कोटींचा प्रस्ताव दाखल 

नांदेड,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  नांदेड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आणि श्रद्धा स्थळांच्या विकासासाठी संवर्धनासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे भरीव निधी मंजूर होणार असून माहूर, राहेर, पाळज, बोरी बु., आणि वाडी येथील साईबाबा मंदिर परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून तब्बल ६६ कोटी रुपयाची विकास कामे होणार आहेत. आता पुन्हा १९ कामांसाठी ४७ कोटींचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.     

नांदेड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा. तेथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी जास्तीत जास्त मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सातत्यपूर्ण पाठपुरावा राहिला आहे.

जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर येथील नृसिंह मंदिर व महानुभव पंथाचे श्रध्दास्थान दत्त मंदिर परिसराच्या विकासासाठी २० कोटी रुपये, कंधार तालुक्यातील महादेव मंदिर बोरी बु. येथील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी २१ कोटी रुपये, भोकर तालुक्यातील पाळज येथील श्री.गणपती मंदिर विकासासाठी ५ कोटी रुपये तर नांदेड शहरालगत असलेल्या वाडी येथील साईबाबा मंदिराच्या परिसर विकासासाठी १० कोटी रुपये, दत्तशिखर संस्थान माहूर येथील परिसर विकासासाठी १० कोटी असा एकूण ६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असून ,यानंतर आता कंधार तालुक्यातील गुंडा येथील नागबरडी देवस्थानच्या विकासासाठी ४ कोटी रुपये,उम्रज येथिल नामदेव महाराज संस्थान २ कोटी तसेच मुदखेड तालुक्यातील शंखतिर्थ येथील नृसिंह मंदिराच्या विकासासाठी ३ कोटी, नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील दत्त मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथील रोकडोबा मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथील दत्त संस्थांच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, लोहा तालुक्यातील किवळा येथील संत बाळगीर महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी ३ कोटी रुपये,भोकर तालुक्यातील शृंगऋषी महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी ३ कोटी, अर्धापूर तालुक्यातील केशवराज मंदिर  परिसराच्या विकासासाठी २ कोटी, उमरी तालुक्यातील गोरठा येथील श्री संत दासगणू संस्थान परिसराचा कायापालट करण्यासाठी २ कोटी, नायगाव तालुक्यातील गंगंबिड येथील महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, बिलोली तालुक्यातील बेळकोणी खु येथील श्रीकृष्ण मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, देगलुर तालुक्यातील होट्टल येथील सिध्देश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी ३ कोटी, करडखेड येथील महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, शहापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, लोहा तालुक्यातील वड्डेपुरी येथील रत्नेश्वरी मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, बिलीली तालुक्यातील कुंडलवाडी येथील कुंडलेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, लिंबगाव , गोपालचावडी येथील श्रीकृष्ण मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी, चक्रधर स्वामी ब्रम्हपुरी येथील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी २ कोटी आणि मुखेड तालुक्यातील वीरभद्र स्वामी ग्राम दैवत मंदिर परिसराच्या विकासासाठी ३ कोटी असा ४७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल केला आहे.         

केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी तत्वत: मान्यता दिली असून प्रसाद योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सचिव, पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. या कामासाठी निधीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिफारस केली असल्याने आगामी काळात भाविक भक्तांना आणि पर्यटकांना अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. वरील सर्व ठिकाणचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी यांना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करून विकास निधी खेचून आणू असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.