कार्यकारी अभियंत्याला कार्यालयात घुसून शिवीगाळ:आरोपीला पोलिस कोठडी

औरंगाबाद,१९ जानेवारी / प्रतिनिधी :-कर्तव्‍यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या कार्यकारी अभियंत्याला कार्यालयात घुसून शिवीगाळ करुन  जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी एकाला बुधवारी दि.१८ रात्री बेड्या ठोकल्या. आरोपीला शुक्रवारपर्यंत दि.२० पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी गुरुवारी दि.१९ दिले. सोनेश चंद्रकांत बनसोडे (३०, रा. गल्ली क्रं.४, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे.

लक्ष्‍मीनगरात राहणारे पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर (५६) हे १८ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्‍या सुमारास कार्यालयात काम करीत  होते. त्‍यावेळी बनसोडे नावाच्‍या व्‍यक्तीने त्‍यांना फोन करुन मी तुझ्याकडे केलेल्या तक्रारीचे काय केलेस, असा प्रश्‍न केला, त्‍यावर येरेकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांशी बोला असे सांगितले. सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास बनसोडे एक व्‍यक्ती एका बाळाला घेवून येरेकर यांच्‍या टेबलजवळ आले. व त्‍यांच्‍या टेबलवरील सामान भिरकावून देत बनसोडे याने माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, दहा हजार रुपये दे, तुला जास्‍त मस्‍ती आली आहे का? पैसे दे नाही तर येथे ड्युटी कशी करतो ते मी बघतो ? असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच येरेकर यांना धक्काबुक्की करुन जीवे मारण्‍याची धमकी देत टेबलवरील अशोक स्‍तंभाने मारहाण करण्‍याचा प्रयत्‍न केला.या  प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपासादरम्यान आरोपी सोनेश बनसोडे याच्‍यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात दोन तर उस्‍मानपुरा, औरंगाबाद लोहमार्ग, क्रांतीचौक आणि करमाड पोलीस ठाण्‍यात प्रत्‍येकी एक गुन्‍हा दाखल असल्याचे समोर आले.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी आरोपीने फिर्यादीला मागितलेले पैसे हे खंडणी म्हणून मागितले काय, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय? याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.