औरंगाबाद सुरु झाली पर्यटनाची दिवाळी! पर्यटनदिनाच्या निमित्ताने उजळले संपूर्ण शहराचे अवकाश!

औरंगाबाद,२४ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या एक दिवस आधी संपूर्ण शहराने एक रोमांचकारी अनुभव घेतला. मराठवाडा पर्यटन विकास संघटनेतर्फे “पर्यटनाचा जागर! मराठवाड्याच्या विकासाचा जागर!” या पर्यटन महोत्सवा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन दि २५ जानेवारी ते २५ फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेले आहे.या उपक्रमास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहाय्यक संचालक विजय जाधव  यांच्या हस्ते व स्मिता हॉलिडेजचे संचालक जयंत गोरे,स्मिता गोरे ,किरण देशपांडे  यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. 

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून दि २४ जानेवारी मंगळवार रोजी शहरातील विविध भागामध्ये आकर्षक लाईट शो व आतिषबाजी चे आयोजन रात्री ०८:३० वा नंतर सूतगिरणी चौक (स्पेस ऑलंपिया बिल्डिंग), क्रांती चौक (कासलीवाल पॅलॅसिओ), बीड बायपास (साई संकेत पार्क), सिडको (सकाळ कार्यालय) अश्या शहराच्या चारहि बाजूने करण्यात आले होते. अतिशय प्रेक्षणीय अश्या ह्या आतिषबाजी आणि लाईट शो चा आनंद शहरवासीयांनी घेतला, तसेच हा नेत्रदीपक सोहळा पाहून असंख्य शहरवासीयांनी मराठवाडा पर्यटन विकास संघटनेचे कौतुक केले, आणि या पर्यटन महोत्सवातील विविध कार्यक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

मराठवाडा पर्यटन विकास संघटनेने, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) आणि स्मिता हॉलीडेस च्या सहकार्याने या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून व योग्य ती काळजी घेऊन हा उपक्रम आयोजित केला होता. पर्यटन महोत्सवाच्या विविध कार्यक्रमाविषयी आपण ९४२१२७६७४३ / ९११२२०२६०४ या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.