एकतर्फी प्रेमातुन मुलीच्या आईवर चाकुने जीवे घेणा हल्ला:आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- एकतर्फी प्रेमातुन मुलीच्या आईवर चाकुने जीवे घेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी मिनाज सीराज काजी (२५, रा़ अब्रार कॉलनी) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविधी कलामांखाली साडेपाच हजारांच्‍या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश विजय कुलकर्णी यांनी ठोठावली.

या प्रकरणी पटेल नगर अब्रार कॉलनीत राहणारा तनविर समशेर पटेल (२४) याने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, तनविर पटेलची बहीण इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेते़ दरम्यान परिसरात राहणारा आरोपी मिनाज काजी हा एकतर्फी प्रेमातुन तीचा नेहमी पाठलाग करुन त्रास देत होता. या बाबत तीने घरी तक्रार केली असता तनविरने आरोपीला समजुन सांगितले़ तरी देखील मिनाज हा त्रास देत होता़ त्यामुळे तनविरच्या कुटूंबीयांनी मुलीला महिनाभर शाळेत पाठविले नाही़  दरम्यान ३१ जानेवारी २०१७ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास तनविरची आई ही दुकानात बसलेली असतांना आरोपी मिनाज हा त्यांच्या दुकानावर आला. त्याने तुम्ही मुलीला बाहेर का येवु देत नाही म्हणत तुला आणि तुझ्या मुलाला मारुन टाकतो अशी धमकी दिली. त्यावर तनविरच्या आईने आरोपीला तेथुन निघुन जाण्यास सांगितले़ त्यामुळे चिडलेल्या आरोपीने चाकुने तनविरच्या आईवर वार करत गंभीर जखमी केले. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याच्‍या सुनवाणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडित मुलीसह तिची जखमी आई आणि शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाचा जबाब महत्वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्‍यावरुन न्‍यायायलाने आरोपी मिनाज काजी याला दोषी ठरवून भादंवी कलम ३२४ अन्‍वये तीन वर्षांची सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंड आणि पोक्सोच्‍या कलम १२ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.