वैजापूर तहसीलच्या नवीन इमारतीला प्रशासकीय मान्यता ; 8 कोटी 93 लक्ष रुपये मंजूर

वैजापूर,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तहसील कार्यालयाची जीर्ण झालेली निजामकालीन जुनी इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन तहसील कार्यालय इमारत बांधण्यात येणार असून या नवीन इमारतीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 893.44 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Displaying IMG-20211014-WA0115.jpg

याप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था झाली होती. तहसील कार्यालयाची नवीन इमारत व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 2012 मध्ये  एक कोटी साठ लाख रुपयाची मान्यता प्राप्त झाली होती.परंतु जागेअभावी तेव्हा इमारत होऊ शकली नाही  त्यामुळे जुनी निजामकालीन इमारत पाडून त्याच जागेवर नवीन तहसील कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी 893.44 लक्ष रुपयांचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने नवीन तहसील इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.तहसील कार्यालयाची जुनी इमारत ही निजामकालीन असून कोणत्याही क्षणी पडू शकते अशी स्थिती आहे. तहसीलचे कर्मचारी मुठीत जीव धरून काम करत असून कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे..याच इमारतीमध्ये महत्त्वाचे शासकीय दस्तावेज ठेवलेले असल्यामुळे इमारत पडल्यास शासकीय दस्तऐवजाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती.

तहसीलच्या निजामकालीन इमारतीचे सार्वजनिक विभागाच्यावतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल या विभागाने दिलेला असूनही  कर्मचारी जीव धोक्यात टाकून कामकाज  सद्यस्थितीत करत आहेत.ही गंभीर बाब असून काही मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर नियोजन व्हावे म्हणून या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरवठा करण्यात आला. नवीन तहसील कार्यालयाची इमारत  व्हावी म्हणून जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्यामुळे जुन्या जागेवर  एल आकाराची तीन मजली भव्य इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. नवीन इमारती मध्ये तळ, पहिला व दुसरा मजला अनुक्रमे 560.60 चौरस मीटर क्षेत्रफळ  असून एकूण 1681 चौरस मीटर क्षेत्रफळावर ही नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे. सदर इमारतीमुळे वैजापुर तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. नवीन इमारतीच्या  893.44 लक्ष रुपयाचा प्रस्तावास प्रशासकीय मान्यता  मिळाली असून  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके मुंबई येथे भेटून आभार व्यक्त केले आहे.