औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्प प्रस्तावास मान्यता

क्रीडा संकुल उभारणीचे काम  गतिमान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

औरंगाबाद,३जून /प्रतिनिधी :- नगर विकास विभागाच्या दोन जून 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार विकास योजना-औरंगाबाद (वाढीव हद्द) मौ. चिकलठाणा स.नं.216.217 मधील क्षेत्र वीटभट्टी या आरक्षणातून वगळून “जिल्हा क्रीडा संकूल प्रकल्प औरंगाबाद” या प्रयोजनसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (2) अन्वये मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचे काम  गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले आहे.

May be an image of one or more people and people sitting

           पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून सदरील जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी हस्तांतरीत करण्याच्या प्रलंबीत प्रश्नावर समाधानकारक निर्णय झाला आहे. या जागेमुळे आता जिल्ह्यासह मराठवाडा विभागासाठी एक दर्जेदार, सुविधांयुक्त प्रशस्त क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती येणार आहे. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी प्राधान्याने या जागेवर तातडीने क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने  गतिमानतेने काम सुरू करण्याचे निर्देशित केले आहे.

             मौ. चिकलठाणा येथील स.नं.216 (क्षेत्र 7.07 हे. आर), आणि स.क्र.217 (क्षेत्र 7.89 हे. आर.) या क्षेत्रावरील “वीटभट्टी” (आरक्षण क्र. 11) हे आरक्षण वगळण्यात येत असून सदर स.क्र. 216 (क्षेत्र 7.07 हे. आर.), स.क्र.217 (क्षेत्र 7.89 हे.आर.) मौ. चिकलठाणा हे (एकूण 14.96 हे. आर.) हे क्षेत्र “जिल्हा क्रीडा संकूल प्रकल्प, औरंगाबाद” प्रयोजनासाठी अटी व शर्तीसापेक्ष आरक्षित करण्यात आले आहे.

       तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे रू. 16.00/- कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे शासनास सादर करण्यात आले होते, त्यास मान्यता प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुल, औरंगाबादसाठी शासनाकडून रू. 384.63/- लक्ष निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीच्या अधिन राहून पहिल्या फेजमध्ये फक्त चार बांधकाम बाबींच्या ई-निविदा मागवून अंतीम करण्यात आल्या    आहेत. या बाबतीत जलद गतीने कार्यवाही करण्यात येईल , असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सांगितले.