लूटमार करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात ,केवळ दोन तासांत पोलिसांना छडा लावला तो आय फोनमुळे !

औरंगाबाद,१७ मे /प्रतिनिधी

हिमायतबागे जवळील टेकडीवर फिरण्‍यासाठी गेलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्‍यात आल्याची घटना रविवारी दि.१६ सकाळी घडली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्‍या काही तासातच आरोपींपैकी दोघांच्‍या मुसक्या आवळल्‍या.

ऋतिक नायबराव दहिजे (२१, रा. जयभिमनगर, टाऊन हॉल) आणि ललीत शंकर अलकुंठे (२४, रा. गुलाबवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना गुरुवारपर्यंत दि.२० पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी सोमवारी दि.१४ दिले.

या प्रकरणात गजानन नगरात एन-११ सिडकोत राहणारा राहुल नानासाहेब शिंदे (२६, मुळ रा. लोणी रोड राऊत वस्‍ती पिंपरी निर्मल, राहता, अहमदनगर) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, राहुल हा १५ दिवसांपूर्वी मीत्र प्रसाद जायभाये याच्‍या रुमवर राहण्‍यासाठी आला होता. १६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्‍या सुमारास राहुल हिमायतबाग टेकडीवर फिरण्‍यासाठी गेला होता. टेकडी जवळ त्‍याला तिघांनी अडवले, व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्‍याची धमकी देत लुटमार केली.

आय फोन केला परत

 आरोपींनी राहुलला चाकूचा धाक दाखवून त्‍याच्‍या खिशातील दोन मोबाइल व दोन हजारांची रोख रक्कम बळजबरी हिसकावून घेतली. तिघांपैकी एक आरोपी एक मोबाइल व पैसे घेवून समोर निघून गेला. उर्वरित दोघे आपसात बोलत होते, हा आयफोन आहे. यामुळे आपण पकडले जावू त्‍यामुळे हा मोबाइल त्‍याला परत करु. त्‍यानंतर दोघा आरोपींनी राहुलला आयफोन परत केला. व शिवीगाळ करुन दोन तास येथून हालू नको, येथून कोठे गेल्यास तुला जीवे मारु अशी धमकी दिली. व तेथून दुचाकीवर निघून गेले.

आयफोन मध्ये काढलेले फोटो पोलिसांना दिले

राहुने दोघे आरोपी तेथून जाताना त्‍यांचे फोटो आयफोन मध्‍ये घेतले होते. घाबरलेला राहूल दोन तासांनी  तेथुन निघाला, घराकडे परतत असताना त्‍याला आमखास मैदाना जवळ दोन पोलिस दिसले, त्‍याने घडलेली घटना त्‍यांना सांगितली. व मोबाइल मध्‍ये काढलेले फोटो पोलिसांना दिले. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अवघ्‍या काही तासात आरोपी गजाआड

राहुलने दिलेल्या फोटो आधारे पोलिसांनी अवघ्‍या काही तासात वरील दोघा आरोपींना अटक केली. त्‍यानंतर दोघा आरोपींना राहुल समोर उभे केले असता, राहुने आरोपींना ओळखले.

आरोपींना पोलिस कोठडी

दोघा आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी आरोपींच्‍या साथीदाराला अटक करणे आहे. आरोपींनी अशा प्रकारे यापूर्वी गुन्‍हे केले आहेत का याचा तपास करणे आहे तसेच आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले हत्‍यार व लुटमार केलेली रक्कम आणि मोबाइल देाखील जप्‍त करणे असल्याने आरोपींना पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.