हिंगोली जिल्ह्याच्या या सुपुत्राला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप!

हिंगोली  ,१७मे /प्रद्युम्न गिरीकर

देशाचा राजकारणातील एक उमदे आणि तरुण नेतृत्व राजीव सातव यांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण मराठवाड्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लोटलेली तमाम मित्र परिवार आणि जनतेची गर्दी साक्ष देत आहे की असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थिती दर्शवून जड अंत:करणाने अखेरचे दर्शन घेतले.

काँग्रेसचे नेते तथा राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यात करिता शेकडोंच्या संख्येने यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अंत्यविधीच्या वेळी सातव कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते.


काँग्रेसचे उमदे नेतृत्व आणि अतिशय कमी काळात राष्ट्रीय राजकारणापर्यंत मजल मारणाऱ्या राजीव सातव यांचे वयाच्या 47 व्या वर्षी पुणे येथे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री कळमनुरी येथे आणण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी त्यांच्या चाहत्यांच्यासाठी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली हाती.

तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासून शेकडो नागरिकांनी कळमनुरी कडे धाव घेतली होती. अंत्य दर्शनाच्या वेळी हजारोंच्या संख्येने जमाव जमला होता.


यावेळी सातव कुटुंबीयांना दुःख आवरणे कठीण झाले होते. राजीव सातव यांची कन्या युवराज्ञी हिची अवस्था मन हेलावून टाकणारी होती. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव व पत्नी प्रज्ञा सातव व मुलगा पुष्कराज यांना देखील शोक आवरणे कठीण झाले होते.


अंत्यविधी करिता प्रशासनाच्या वतीने पूर्वीच तयारी करण्यात आली होती. शासकीय इतमामात हवेत तीन फैरी झाडून सातव यांना मानवंदना देण्यात आली.


या अंत्यविधी करिता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, असलम शेख, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे , माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजीराव माने, प्रकाश पाटील देवसरकर, आमदार जीशान सिद्दिकी, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, गुजरात विरोधी पक्षनेते धनानी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंडल, काँग्रेस नेते रेड्डी, सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, गजानन घुगे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


राजीव सातव अमर रहे….


अंत्यविधी करिता महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाड, केरळ, पंजाब, तेलंगणा आदी भागातून कार्यकर्ते श्रद्धांजली करिता उपस्थित झाले होते.

यावेळी अमर रहे…अमर रहे… राजीव सातव अमर रहे… अशी आर्त घोषणा कार्यकर्त्यांनी दिली.