श्रद्धा वालकरचा जीव वाचवता आला असता? २०२०मधल्या एका पत्राची प्रत वायरल

मुंबई ,२३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. बुधवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबने श्रद्धाला यापूर्वीही मारहाण केली होती. तिने लिहिले २ वर्षापूर्वीचे पात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. साधारण नोव्हेंबर २०२०मध्ये श्रद्धाने पालघर पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धाने आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला, अशी तक्रार केली आहे. माझी हत्या करुन तुकडे करेल, अशी धमकीही आफताबने दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. वेळीच जर या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर तिचा जीव वाचवता आला असता अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात श्रद्धाने तक्रार केली होती. आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यानचा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर आफताबने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. आफताबने केलेल्या मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते. तिच्या मानेलाही दुखापत झाली होती, अशी माहिती ओझोन हॉस्पिटलच्या डॉ. साईप्रसाद शिंदे दिली.

फडणवीस यांची ‘ही’ प्रतिक्रिया

श्रद्धाच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “मलाही ते पत्र मिळाले आहे. मी ते पाहिले आहे. अतिशय गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची चौकशी करावी लागेल. मी कोणावरही आरोप करणार नाही. मात्र या प्रकारच्या पत्रांवर कारवाई न झाल्यास अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राची नक्कीच चौकशी केली जाईल. त्या पत्रावर कारवाई झाली असती तर कदाचित श्रद्धाचे प्राण वाचले असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.