अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री प्रकरणात तीन महिन्‍यांपासून पसार आरोपींपैकी दोघांना अटक

औरंगाबाद,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री प्रकरणात  एमआयडीसी सिडको पोलिसांनी तीन महिन्‍यांपासून पसार आरोपींपैकी दोघांना रविवारी दि.२९ पहाटे अटक केली. अजय लिलाधर गोसावी (रा. जैनाबाद ता.जि. जळगाव) आणि ट्रान्‍सपोर्ट ट्रक (क्रं.एमएच-१९-झेड-४६५७) चा मालक मनोज उर्फ मयुर शालिक चौधरी (रा. ता.जि. जळगाव) अशी अटक करण्यात  आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. घोडके यांनी दिले.

आरोपींच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. आरोपी गुटखा कोठे तयार करतात, आरोपींनी गुटख्‍याचा आणखी कोठे-कोठे साठा करुन ठेवला आहे. याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक वामन बापुराव बेले (४३) यांनी फिर्याद दिली.१७ ऑक्‍टोबर २०२२ रोजी रात्री नारेगाव कचरापट्टी परिसरात सुगंधी तंबाखु, गुटख्‍याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याची माहिती फिर्यादी व त्‍यांच्‍या पथकाला मिळाली होती. त्‍या आधारे बेले आणि त्‍यांच्‍या पथकाने रात्री सव्वा अकरा वाजेच्‍या सुमारास नारेगाव कचरापट्टी येथे छापा टाकून चौघा आरोपींना अटक केली. त्‍यांच्‍याकडून चार चाकी वाहने (क्रं. एमएच-१९-झेड-४६५७), (क्रं. एमएच-०२-बीएम-६५०७), (क्रं. एमएच-२०-ईएल-४७४६), (क्रं. एमएच-२०-ईएन-४७३६), गुटखा, मोबाइल, रोख रक्कम असा सुमारे २५ लाख १ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे.या  प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.