बलात्‍कार करणाऱ्या सावत्र बापाला २० वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- अल्पवयीन मुलीवर लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही बलात्‍कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एकूण १७ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती.पीडितेच्‍या वडिलांचे  २००५ मध्‍ये निधन झाले होते. वर्षभरानंतर पीडितेच्‍या आईचा गंधर्व विवाह नात्‍यातील आरोपी सावत्र बापाशी झाला. काही दिवस चांगले राहिले नंतर २०१४ मध्‍ये आरोपी सावत्र बापाने पीडितेवर वाईट नजर टाकण्‍यास सुरवात केली. पीडितेची आई लग्नसराईत दोन-तीन दिवस कामाला जायची. असेच एके दिवशी पीडितेची आई कामाला गेली होती, ही संधी साधत आरोपी सावत्र बापाने पीडितेवर बलात्‍कार केला. व तु जर तुझ्या आईला काही सांगितले, तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. त्‍यानंतर आरोपी वारंवार पीडितेवर बलात्‍कार क‍रित होता.

१५ मे २०१५ मध्‍ये पीडिता अल्पवयीन असतानाही आरोपीने तिचा विवाह वैजापुर येथे लावून दिला. लग्नानंतरही आरोपी हा पीडितेला नांदायला जावू देत नव्‍हता, व पीडितेची आई घरी नसल्यावर पीडितेच्‍या लहान भाऊ व बहिणीला घरा बाहेर पाठवून तिच्‍यावर बलात्‍कार करित होता. २६ जून २०१५ रोजी पीडितेच्‍या आईची प्रकृती ठीक नसल्याने पीडिताही माहेरी आली होती. त्‍यानंतर आरोपीने पुन्‍हा पीडितेला शारिरीक त्रास द्यायला सुरवात केली. तेव्‍हा पीडितेने माझे लग्न झाले आहे, मला आता तरी सोडा अशी विनवणी  केली. त्‍यावर आरोपीने तिला शिवीगाळ केली. नेहमी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडितेने १७ जुलै २०१५ रोजी सर्व घटन आईला सांगितली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडिता, डॉक्‍टर, मुख्‍याध्‍यापक आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्‍वाची ठरली. प्रकरणात दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्‍वये तीन महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, पोक्सोचे कलम चार अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, पोक्सोचे कलम सहा अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि बालविवाह प्रतिंबध कायद्याचे कलम ११ अन्‍वये तीन महिने कारावास आणि एक हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.