वैजापुरात रेशनच्या धान्याची तस्करी सुरूच ; तांदळाची वाहतूक करणारी वाहने पकडली

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरासह तालुक्यात धान्याची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील एका नाल्याजवळ पोलिसांनी तांदळाची वाहतूक करणारी दोन वाहने पकडून पोलिस ठाण्यात लावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 

वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील एका  नाल्याजवळ एम. एच. 15 एफ. व्ही. 6531 व एम. एच. 45 टी. 1413 ) या क्रमांकाचे दोन पिकअप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयास्पद उभे होते. त्याचवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वाहन येथून जात होते. या वाहनात पोलिस कर्मचारी रामेश्वर काळे व लक्ष्मण पंडित होते. तत्पूर्वी वैजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही तेथे होते. त्यांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये स्वस्तधान्य दुकानांमार्फत वितरित केला जाणारा तांदूळ आढळून आला. या दोन्हीही वाहनांमध्ये तांदळाच्या 70 ते 75 गोण्या आढळून आल्या. वाहनातील गोण्या या रेशनच्याच असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. याबाबत पोलिसांनी महसूल विभागाच्या पुरवठा विभागास पत्र दिले असून त्यानंतर याबाबत अधिक सत्य बाहेर येईल. दरम्यान हा तांदूळ शहरातील एका नगरसेवकाचा दुकानातून भरून तो काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रारंभी ही वाहने पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पकडल्यानंतर चालकांशी ‘बोलणी’ सुरू असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील कर्मचारी तेथे अचानक पोहचल्यानंतर बोलणी फिस्कटली. अशी चर्चाही पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.