साईबाबा संस्थानच्या अध्यक्षाची बनावट तक्रार प्रकरणी पोलिसांना कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश

औरंगाबाद ,१३ मार्च २०२१:

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षाची बनावट तक्रार प्रकरणी पोलिसांना कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय  गंगापूरवाला व न्या. आर जि अवचट यांनी शिर्डी पोलिसांना दिले . 

शिर्डी येथील माजी विश्वस्त श्री.उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट  येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने नवीन विश्वस्त शासनामार्फत नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नासिक व सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार ९ऑक्टोबर २०१९ च्या आदेशात दिले होते. सदर समिती ऑक्टोबर , २०१९ पासून साईबाबा संस्थान चा कार्यभार सांभाळत असून उच्च न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय  घेत आहे.

दरम्यान साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांच्या कारभाराबद्दल याचिकार्ते उत्तम शेळके यांच्या नावाने बनावट तक्रार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात अली होती. सदर तक्रार न्यायालयाची दिशाभूल व याचिकाकर्त्यांची व तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर  यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने केली असल्याचे शपथपत्र याचिकाकर्त्याने दाखल केले आहे. मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे अश्या अजून हुबेहूब ३ तक्रारी शिर्डी येथील शिवाजी गोंदकर, नितीन कोतें व कैलास कोते यांनी देखील केल्या आहेत. सदर तक्रारीतील काही मुद्दे व कागदपत्रे गोपनीय असून सर्वसामान्यांना मिळणे अशक्य आहे, काही कागदपत्रे व मुद्दे न्यायप्रविष्ट विषयाबद्दल आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर व साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील व्हाट्सअँप संदेश देखील सदर तक्रारीबरोबर जोडले आहे. सदर व्हाट्सअँप संदेश त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणाकडे मिळणे अशक्य असताना तसे संदेश तक्रारी बरोबर जोडले आहेत असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकाकर्ते यांनी सदर बनावट तक्रारींवर त्यांची बनावट सही करून गंभीर गुन्हा केल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाणे येथे दिली होती. त्यात उत्तम शेळके यांनी श्री. कान्हुराज बगाटे, साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांच्या सांगण्यावरून इतर कोणी बनावट तक्रार केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. सदर बनावट तक्रार प्रकरणी श्री. कान्हुराज बगाटे, साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवाजी गोंदकर, नितीन कोतें व कैलास कोते यांची चौकशी करावी व सर्व तक्रार कोणी बनवल्या व कोणाच्या सांगण्यावरून बनवल्या व तक्रारीसोबत जोडलेले कागद कोणी व कसे दिली याची चौकशीची मागणी शेळके यांनी केली आहे. 

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायायालयाचे न्या. गंगापूरवाला व न्या.अवचट यांनी शिर्डी पोलिसांना उत्तम शेळके यांच्या नावे संस्थानच्या अध्यक्षाची बनावट तक्रार प्रकरणी, त्यांनी शिर्डी पोलीस ठाणे येथे  दिलेल्या तक्रारींवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे  तर शासनाच्या वतीने डी आर काळे काम पाहत आहे.