घाटी रूग्णालयास आवश्यक औषधी वैद्यकीय साहित्य त्वरीत उपलब्ध करून द्या-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) औषधी, वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला असून घाटी रूग्णालयास आवश्यक औषधी, वैद्यकीय साहित्य त्वरीत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे आज (दि.13) निवेदनाव्दारे केली आहे.

May be an image of 1 person and standing

             आ.सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) गोर गरिबांचा आधार म्हणून ओळखले जाते. केवळ मराठवाडाच नव्हे तर विदर्भ, खान्देशातील अनेक जिल्ह्यातील हजारो रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र मागील एक-दीड महिन्यांपासून घाटीमध्ये नॉनकोविड रूग्णांसाठी लागणारा औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांना हाफकिन इन्स्टिट्यूकडून औषधी तसेच वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे मागच्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाने (घाटी) आवश्यक असणारी औषधी व इतर वैद्यकीय साहित्य मिळण्यासाठीचा प्रस्ताव 4 मे 2021 रोजी हाफकिन इन्स्टिट्यूटकडे पाठवला. मात्र अद्यापही घाटीला औषधी व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले.

             औषधींच्या तुटवड्यामुळे घाटीमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना सलाईनपासून सर्व प्रकारची औषधी बाहेरून विकत आणावी लागत असून गरीब रूग्णांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच रूग्णांच्या नातेवाईकांमधून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होत असून घाटीतील परिचारिकांना या रोषास सामोरे जावे लागत आहे. औषधांचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता कोविड रूग्णांसाठीची औषधे नॉनकोविड रूग्णांसाठी उसनवारीवर वापरण्याची वेळ घाटी प्रशासनावर आली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.