दुचाकीवर बनावट क्रमांक:आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

औरंगाबाद/प्रतिनिधी
दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा आरोपी शब्बीर शहा शरीफ शहा (52, रा. पडेगाव) याच्या पोलीस कोठडीत शुक्रवार दि.5 मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी बुधवार दि.3 मार्चरोजी दिले.
1 मार्च रोजी सायंकाळी चेलीपुरा चौकात सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी दुचाकी (क्रं. एमएच-20-एई-8546) वर जाणार्‍या शब्बीर शहा याला पोलिसांनी थांबवले. पोलिसांनी वाहनाविषयी चौकशी केली असता शब्बीर शहा उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने दुचाकीवर बनावट क्रमांक टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला 1 मार्च रोजी अटक करण्यात आली तर न्यायालयाने त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी गुन्ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.